शनिवार, १४ सप्टेंबर, २०१९

पर्यटन विद्यापीठे स्थापन करा


भारताकडे इतकी प्रचंड स्वरुपातील नैसर्गिक विविधता आणि साधने आहेत की ज्याचा उपयोग सर्वात मोठ्या रोजगार निर्मितीसाठी होऊ शकतो. भारताला लाभलेला आठ हजार किलोमीटरचा विस्तीर्ण किनारा ,भूभागाची विविधता पाहिली तर सांस्कृतिक, सामाजिक विविधता तर दिसून येतेच. त्या त्या ठिकाणची ऐतिहासिक स्थळे, स्थापत्य, कला पूरातत्वदृष्ट्या महत्वाची अशी ठिकाणे एवढेच नव्हे तर भारतातील नद्या, पर्वत, अभयारण्ये अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या पर्यटनाचा आनंद निर्माण करून देतात. दुदैर्वाने भारताकडे असलेली ही पर्यटन संपदा अक्षम्य दुर्लक्षित झालेली आहे.
अलिकडेच वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टूरिझम कौन्सिलचा जागतिक अहवाल प्रसिध्द झाला. त्यात २0२८ पर्यंत भारत हा जगातील तिसर्‍या क्रमांकाचा पर्यटनाची शक्ती असलेला देश म्हणून पुढे येईल आणि त्यातून थोडेथोडके नव्हे तर एक कोटी लोकांना रोजगार उपलब्ध होतील. अहवालामध्ये हेही स्पष्टपणे सांगितले गेले की प्रवास आणि पर्यटनाच्या माध्यमातून नव्याने रोजगार निर्मिती होऊ शकते. मात्र चांगल्या पर्यटनासाठीच्या मूलभूत सोयीसुविधा आपल्याकडे उपलब्ध नाहीत. भारताकडे जर इतकी प्रचंड पर्यटनाची ताकद असेल तर या विषयीचा स्वतंत्र अभ्यास करणारे पर्यटन विद्यापीठ स्थापन झाले पाहिजे. आज सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या देशात रोजगाराची प्रचंड गरज असताना आणि पर्यटनातून ते मिळण्याची शक्यता असताना पर्यटनाचा अद्ययावत अभ्यास शिकवणारे विद्यापीठच नसावे हे आश्‍चर्यकारक ठरते.  शासनाने पर्यटन व्यवसायाला अधिक चालना देण्याबरोबरच विद्यापीठे स्थापन केल्यास त्याचा पर्यटन वाढीस उपयोग होईलच, रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा